Wednesday, 15 July 2015

Chakan's Sangramdurg Fort | चाकणचा संग्रामदुर्ग किल्ला

चाकणचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. 
चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण पूर्वीचे खेडेगाव तर सध्याचे वाहन उद्योगाने प्रचंड विस्तारते शहर. चाकण मध्ये दोन्ही पैकी कुठल्याही वेशीतून प्रवेश केल्या नंतर अवघ्या काही अंतरावर जुन्या पुणे नाशिक रस्त्यावरून चालत आल्यास भग्नावस्थेतील तट बंदी दिसू लागते.ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकण चा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे
इतिहासाची पाने डोळयासमोर फडफडविनारा चाकण चा भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला आणखी काही वर्षांनी येथे होता असे सांगण्याची वेळ येणार हे निश्चित आहे .याबाबत शासनाने योग्य त्या उपाय योजना करून संवर्धनासाठी खरेखुरे प्रयत्न करावेत अशी माफक अपेक्षा दुर्गप्रेमी ,इतिहास संशोधक ,व नागरिक करीत आहेत. शिवरायांच्या फक्त एका शब्दाखातर, आदिलशाही नोकरी सोडुन स्वराज्यात सामिल झालेले किल्लेदार फिरंगोजी नरसाळा, स्वराज्यात येताना ते एकटेच नाही आले, तर चाकण सारखा अतिशय देखणा आणि मजबुत किल्ला त्यांनी शिवरायांना हसत हसत नजर केला. शिवरायांसारखा रत्नपारखी राजा, त्यांनी ह्या अलौकिक रत्नाला नुसते स्वराज्यात सामिलच करुन घेतले नाही तर फिरंगोजींना चाकणची किल्लेदारीपण बहाल केली. स्वराज्यात आलेले फिरंगोजी, परत जाताना स्वराज्याचा नेक,विश्वासू सहकारी हि पदवी , किल्लेदारीची वस्त्रे, आणि प्रेमानी उचंबळुन, भरुन आलेला ऊर संगाती घेऊन शिवरायांकडून चाकणकडे परतले.. स्वराज्यावर एकापेक्षा एक भीषण संकटे येऊनसुद्धा फिरंगोजीनी चाकण आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला.
शहिस्तेखानाच्या बलाद्य फौजेला चाकणचा भुईदुर्ग म्हणजे तसं अगदी मातीचं छोटसं ढेकुळ, तरीही शहिस्तेखानाच्या अवाढव्य लमाजम्याला हा एक किल्ला घ्यायला तब्बल 55 दिवस लागले.खरं तर फार फार उमेदीने आणि प्रचंड सैन्यानिशी हा खान दख्खनेत आला होता, मात्र चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून खदाखदा हसला असेल. या किल्ल्याची सध्याची स्थिती पाहिल्यास काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का असा प्रश्न दुर्ग प्रेमी विचारू लागले आहेत. आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती. शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शाहिस्ते खान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही खूप भक्कम दुर्ग नव्हे.आधीचतो स्थलदुर्ग;पण खांद्काने वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चाललातोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शाहिस्ते खानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्यामराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. फिरंगोजी नरसाळ्याने सयाजी थोपटा ,मालुजी मोहिता, भिवा दूधावडा , बाळाजी कर्डीला याच्यासह शूर ३०० - ३५० लोकांनीशी चाकण तब्बल ५६ दिवस झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे भिवा दूधावडा सह सव्वाशे मावळेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मोघलीसैन्याने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. मावळ्यांचे साहस पर्व कडू घोट घेत संपले . त्यानंतर संग्राम दुर्गाच्या दुरवस्थेचे सुरु झालेले फेरे अद्यापही कायम आहेत . शासनाकडून भूल थापांच्या आश्वासना शिवाय या किल्ल्याला काहीच मिळाले नाही .किल्लेदार फिरांगीजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या एकाकी प्रयत्नांना शासनाची असहकाराची भूमिका हरताळ फासत आहे. भीषण संकटे येऊनसुद्धा किल्लेदार फिरांगोजीने चाकण चा हा किल्ला आपल्या लेकराप्रमाणे संभाळला, अतिशय मेहेनतीने राखला, सजवला आता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी वारंवार होऊ लागली आहे.चाकण च्या किल्ल्याचा एक टवका उडवायला एवढा संघर्ष करावा लागल्याने खानाच्या तोफांचा प्रचंड मारा सहन करतानाही संग्रामदुर्ग किल्ला हि खाना कडे पाहून तेंव्हा खदाखदा हसला असेल ,आता मात्र शासनाच्या अनास्थेने ढसाढसा रडत असेल ... दरम्यान २०१२ च्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने या किल्ल्याच्या संवर्धनासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात यास एक वर्षाचा कालावधी लोटूनही या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामास सुरुवात झालेली नाही. दरम्यान शासनाकडून उपलब्ध झालेल्या पहिल्या टप्प्यातील १ कोटींच्या निधीतून चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्याच्या रणमंडळा जवळील सुर्यमुखी दरवाज्या पासून एका बाजूची तटबंदी जवळपास पूर्ण झाली असून त्या लगतच्या भागातील बुरुंजाजवळील तटबंदीच्या मजबुतीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. भग्नावस्थेतील तट बंदी व कोट शिल्लक राहिलेल्या चाकण च्या भुईकोट संग्रामदुर्ग किल्ला अखेरच्या घटका मोजत असताना २०१४ च्या फेब्रुवारी पासून या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. राज्य शासनाने या किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देत राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची भरीव मदत जाहीर करून दोन वर्षे लोटली होती तरी दुरुस्ती व संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती त्यामुळे दुर्गप्रेमी आणि चाकणकर नागरिकांमध्ये नाराजी होती. मात्र या ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष वेगाने सुरुवात झाल्याने किल्ल्याच्या दुरावस्थेचे फेरे आता संपुष्टात येणार असून चाकणच्या संग्रामातील या साक्षीदाराची संवर्धनाची प्रतीक्षा आता संपली आहे. मात्र संपूर्ण किल्ल्याच्या संवर्धन आणि तटबंदी साठी आणखी निधीची गरज असून हा निधी केंव्हा उपलब्ध होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.चाकणचा किल्ला (Chakan Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी

पूणे - नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भूइकोट किल्ला उर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिध्द आहे. प्राचिनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भूइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. प्राचिन व दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या या किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय वाईट आहे.
इतिहास :
चाकणचा भूईकोट किल्ला हा प्राचिन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले(१४५३). या मोहीमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून निबीड अरण्यात आणले व या मोक्याच्या जागी त्यांच्यावर अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली. (गनीमी काव्याने लढल्यागेलेल्या या पहिल्या लढाइचा समग्र वृत्तांत वाचण्यासारखा आहे ).

या मोहीमेत दक्षिणी मुसलमान व परकीय मुसलमान यांच्यात बेबनाव झाल्यामुळे दक्षिणेकडील मुसलमान मोहीम अर्धवट सोडून चाकणला परत आले. त्यांच्या भ्याड व फितूर वर्तनामुळे विशाळगड मोहीम अपयशी ठरली, असे परकिय मुसलमान बोलू लागले. हा आरोप शहाला कळला तर आपली धडगत नाही हे दक्षिणी मुसलमानांना कळल्यावर त्यांनी शहाला खबर दिली की, परकीय मुसलमानांनी चाकणच्या किल्ल्यावर कब्जा केला असून त्यांना कोकणच्या राजाची साथ आहे. शहा दारु पिऊन तर्र झाला आहे हे पाहून त्याला ही बातमी देण्यात आली. त्याने हुकूम दिला चाकणच्या किल्ल्यावर हल्ला करुन सर्व परकीय मुसलमानांना ठार मारावे. या आज्ञेनुसार दक्षिणी फौजेने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्यातील परकीय मुसलमानांनी किल्ल्यातील सामग्री संपेपर्यंत वेढ्याला दाद दिली नाही. अखेरीस दक्षिणी मुसलमानांनी परकीय मुसलमानांना शहाने माफी केले आहे, असा बनावट हुकूम दाखवून त्यांना किल्ल्याच्या बाहेर काढले व त्यांना मेजवानीस बोलवले. जेवण चालू असतांना त्यांची कत्तल केली.

शिवाजी राजांचे पणजोबांचे(बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौर्‍यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहागिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.

२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भूइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदूकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने इशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. त्यावेळी झालेल्या प्रचंड स्फोटाने बुरुजाला खिंडार पडले, बुरुजावरील मराठे मारले गेले. मोगली सेना खिंडारातून किल्ल्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागली पण मराठ्यांनी त्यांना किल्ल्यात शिरकाव करु दिला नाही. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.
भूगोल :

पहाण्याची ठिकाणे :
चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पुर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशव्दार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्प पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशि अलीकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो.किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरिल कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंट चा रस्ता बांधण्यात आला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय चाकण आणि तळेगाव येथील हॉटेलात होते.
पाण्याची सोय :
पिण्याच्या पाण्याची सोय स्वत: करावी.
सूचना :
चाकणचा किल्ला, इंदुरी किल्ला, भंडारा डोंगर आणि भामगिरी एका दिवसात पाहाता येतात.